विठ्ठलाला कानडी भक्ताकडून २५ लाखांचा चंद्रहार अर्पण 

पंढरपूर: पोलीसनामा ऑनलाईन-पंढरपुरचे विठ्ठल मंदिर म्हणजे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पंढरपूरची वारी तर जगप्रसिद्धच आहे पण आता पंढरपूरच्या  विठुरायाची आणि एका गोष्टीमुळे चर्चा सुरु आहे. विठ्ठलाला कानडी भक्ताने आज तब्बल पाऊण किलो वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला. या चंद्रहाराची किंमत २५ लाख रुपये इतकी आहे. राघवेंद्र राव असं या विठ्ठलभक्ताचं नाव आहे. राव हे बेंगळुरू येथील हॉटेल व्यावसायिक आहेत.

स्वप्नी आला विठुराया 

स्वप्नात विठुराया आल्यामुळं काही दिवसांपूर्वी ते पंढरपूरला दर्शनासाठी आले होते. त्यावेळी राव यांनी देवाला सोन्याचा चंद्रहार अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज सहकुटुंब मंदिरात येऊन त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली. पाऊण किलोच्या या चंद्रहारावर अतिशय बारीक कलाकुसर करण्यात आली आहे. जीएसटी आणि कारागिरांच्या खर्चासह राघवेंद्रराव यांना हा हार ३४ लाख रुपयांना पडला.

गोरगरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठुरायाला भाविकांकडून लाखो रुपयांचे अलंकार भेट मिळण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, अलीकडच्या काळात देवाला मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे.