शेतकरी आंदोलन : कंगना रणौतला कायदेशीर नोटीस; ‘त्या वद्ध महिलेची माफी मागावी नाही तर…’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं अलीकडेच शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं होतं. कंगनानं शेतकरी आंदोलनातील एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात सहभागी होणाऱ्या 90 वर्षीय बिलकिस दादी सोबत केली होती. कंगनाचं याच आशयाचं एक ट्विट रिट्विट केलं होतं. यामुळं आता कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंह यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामुळं आता कंगना पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे.

कंगनाला पाठवलेल्या नोटिसीत तिनं माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. यासाठी तिला 7 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

नोटिसीत नेमकं काय म्हटलंय ?

हाकम सिंह यांनी पाठवलेल्या नोटिसीत म्हटलं आहे की, आंदोलन करणं हा प्रत्येक व्यक्तीचा संविधानिक अधिकार आहे. कंगनानं केलेल्या वक्तव्यामुळं या वृद्ध महिलेसह देशातील इतर महिलांचाही अपमान झाला आहे. त्यामुळं या प्रकरणी कंगनानं माफी मागावी. जर तिनं माफी मागितली नाही तर तिच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असंही यात स्पष्ट केलं आहे. कंगनाला 7 दिवसांचा वेळ दिल्याचंही सांगण्यात आलं आहे.

काय म्हणाली होती कंगना ?

कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, लज्जास्पद. शेतकऱ्यांच्या नावाखाली प्रत्येकजण आपली पोळी भाजत आहे. आशा आहे की, सरकार अँटी नॅशनल गोष्टींना याचा फायदा घेऊ देणार नाही आणि टुकडे टुकडे गँगला दुसरं शाहीन भाग नाही बनवू देणार, असंही ती म्हणाली होती.

कंगनानं एका ट्विटला रिट्विट केलं होतं. यात प्रोटेस्टमध्ये दिसणाऱ्या वृद्ध महिलेबद्दल ट्विट केलं होतं. ज्या शाहीन बागेत सहभागी असणाऱ्या दादी बिलकीस बानो असल्याचं सांगितलं जात होतं. ट्रोल झाल्यानंतर कंगनानं हे ट्विट डिलीट केलं. कारण तिनं जे ट्विट रिट्विट केलं होतं ते फेक होतं.

You might also like