महाराष्ट्र तुमच्या मालकीचा असल्यासारखे का वागताय ?, कंगनाचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांनी काल दसरा मेळाव्यात टीका केल्यानंतर कंगना राणावत ( kangana Ranaut) पुन्हा एकदा समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी या भाषणात मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून भाषण करतोय, असं म्हणत भाजप, मोदी सरकार, कंगना राणावत , राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा ( Bhagatsingh Koshyari) समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी कंगनावर केली होती. या टीकेवर कंगनाने मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. लोकसेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टींवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता तुमच्याशी सहमत नसलेल्या इतरांचा अपमान करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी,’ अशा शब्दांत तिने ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं ? हे केवळ जनतेचे सेवक आहेत. यांच्या आधी कोणीतरी होतं. यांच्यानंतर कोणीतरी वेगळी व्यक्ती त्यांच्या जागी असेल. ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकीचा असल्यासारखं का वागतात?’ असा सवाल देखील कंगनानं उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, असे म्हटले होते. या टीकेला देखील तिने प्रत्युत्तर दिले आहे. याविषयी बोलताना ज्या प्रकारे हिमालयातलं सौंदर्य प्रत्येक भारतीयासाठी आहे, त्याचप्रकारे मुंबई देखील सगळ्यांची आहे. तिथे मिळणाऱ्या संधी प्रत्येक भारतीयासाठी आहेत. उद्धव ठाकरे, आम्हाला लोकशाहीनं दिलेले अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करू नका. तुमची गलिच्छ भाषणं तुमची अकार्यक्षमता दाखवतात, असे म्हणत कडक टीका केली आहे.

मेळाव्यात काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?
या मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा ( Narendra Modi) अपमान आहे, असे म्हटले होते. तसेच, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची. अनधिकृत बांधकाम मुंबईत करायची. हिंमत असेल तर पाकव्याप्त सोडा काश्मीरमध्ये अधिकृत बांधून दाखवा. मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले होते. याशिवाय, सुशांतसिंह राजपूत ( Sushantsingh Rajput) याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या ते सगळ्या जगाने पाहिले असेही यावेळी त्यांनी भाषणात म्हटले आहे.

You might also like