मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिकेकडून आपल्या बंगल्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदा असल्याचं सांगत उच्च न्यायालयात धाव घेणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनं आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही कोर्टात खेचले आहे. कंगनाच्या विनंतीवरून संजय राऊत यांनाही या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पालिकेचे सहायक आयुक्त भाग्यवंत लाटे यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात येणार आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना व कंगना यांच्यात जुंपली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं वांद्रे येथील कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर कारवाई केली होती.
ही कारवाई बेकायदा असल्याचं सांगत कंगनाकडून महापालिकेच्या विरोधात नुकसान भरपाईचा दावा करण्यात आला आहे. ‘माझ्या बंगल्यालगतच फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा यांचासुद्धा बंगला आहे. त्या बंगल्यातही कथित बेकायदा बदल व अतिरिक्त बांधकाम करण्यात आलं आहे. मुंबई पालिकेकडून त्यांनाही नोटीस बजावण्यात आले होते. मात्र त्याला सात दिवसांची मुदत आणि मला फक्त २४ तासाची मुदत देऊन तडकाफडकी नोटीस देऊन कारवाई करण्यात आली आहे.असे कंगनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
या प्रकरणाची न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढं सुनावणी करण्यात आली. त्यावेळी, संजय राऊत यांच्याकडून माझ्याविषयी काही विधाने करण्यात आली. त्यानंतरच महापालिकेने दुष्ट हेतूने आणि आकसापोटी ही कारवाई केली, असा आरोप करत कंगनाकडून कोर्टात संजय यांच्या विधनांविषयीची एक डीव्हीडी सादर करण्यात आली. तेव्हा हे तुम्हाला कोर्टाच्या नोंदीवर आणायचे असेल तर राऊत यांना प्रतिवादी करावे लागेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यानंतर कंगनाच्या विनंतीवरून न्यायालयानं संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी देणारा आदेश काढला.’मनीष मल्होत्राच्या बंगल्यावरील कारवाईविषयी कंगनानं केलेल्या उच्च न्यायालयानं दाव्याची दखल घेत अशा बंगल्यांविषयी किती दिवसांची नोटीस दिली होती आणि कारवाई झाली का? त्याचा तपशील शुक्रवारी सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत.