लॉकडाऊनवरून कंगनाचा पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा, फोटो ट्विट करून म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे आपल्या भूमिका मांडते. कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. यावेळी तिने महाराष्ट्रातील लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. काहीवेळा पूर्वीच कंगनाने ट्विटवर एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरून बंद असून सर्व बाजूंनी खुला आहे. दरवाजाचा हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असा आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने 1 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनला राज्यात अतिशय संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. बरेच लोक त्याचे योग्यरित्या अनुसरण करत आहेत, तर काही लोक अजूनही रस्त्यावर फिरत आहेत. दरम्यान गेल्या वर्षी ठाकरे सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामाची तोडफोड केली होती. तेंव्हापासून ती सतत ठाकरे सरकारवर टीका करत असते. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर कंगनाने देशमुख यांच्यावरही निशाणा साधला होता.