‘5 वर्ष आधार – पॅन लिंक करण्यात गेली, आता आगामी 5 वर्ष जन्म दाखले मिळवण्यात जातील’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार नागरिकत्व सुधारणा विधेयक आणत आहे. यावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “देशातील ‘राष्ट्रवादी’ सरकार सार्वजनिक क्षेत्राला चार – आठ आण्यात विकून टाकेल”, अशा शब्दात कन्हैया कुमारने मोदी सरकारला लक्ष केले.

कन्हैयाने आपल्या ट्विटमधील देशातील सार्वजिक क्षेत्राचे होत असलेले खासगीकरण, शिक्षण, रोजगार या मुद्यांवर मोदी सरकारला लक्ष केले. त्यानंतर तो ट्विटमध्ये म्हणाला की, “मागील 5 वर्षे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यात गेली. आता पुढचे 5 वर्ष आजोबांच्या आजोबांचे जन्मदाखले तयार करण्यात जातील. याच काळात ‘राष्ट्रवादी’ सरकार सार्वजनिक क्षेत्राला चार-आठ आण्यात विकेल आणि ट्रेनच्या तिकीटापासून महाविद्यालयाच्या पदवीपर्यंत सर्व काही गरिबांच्या आवाक्याबाहेर जाईल.”

कन्हैया कुमारने मोदी सरकारवर आज जोरदार टीका केली. तो म्हणाला, देशवासीयांना विविध कागदपत्र मिळवण्यासाठी सरकारच्या विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतील. या गदरोळात ओएनजीसी, बीएसएनएल, एअर इंडिया आणि रेल्वेची विक्री होईल. त्यानंतर खासगी तेजस रेल्वेतून प्रवासासाठी 400 रुपयांऐवजी 4000 रुपयांचे तिकिट काढून प्रवास करावा लागेल. 10 लाख खर्च करुन पदवी घेणाऱ्या तरुणाला 10 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी करावी लागेल.

Visit : policenama.com