‘कन्हैया’वर राजद्रोहाचा खटला चालविण्यास मान्यता दिल्यानं अभिनेत्री सिमी गरेवाल भडकल्या CM केजरीवालांवर, सुनावलं खरं-खोटं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवुडचे काही कलाकार आपल्या चित्रपटांशिवाय सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्यानेही चर्चेत असतात. यापैकीच एक बॉलीवुड अभिनेत्री सिमी गरेवाल सुद्धा आहेत. सिमी गरेवाल मोठ्या कालावधीपासून चित्रपटांपासून दूर आहेत. त्या सोशल मीडियावर खुप सक्रिय असतात. तसेच सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर आपली प्रतिक्रिया देत असतात. आता त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत परखड प्रतिक्रिया दिली आहे.

2016 मध्ये जेएनयूमध्ये घोषणाबाजी वाद प्रकरणात विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्यासह अन्य आरोपींवर देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी दिल्ली सरकारने शुक्रवारी परवानगी दिली. दिल्ली सरकारकडून देण्यात आलेल्या परवानगीवर सिमी गरेवार यांनी ट्विटरवर अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, कन्हैया कुमारवर खटला चालवण्यास परवानगी देऊन अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने तो सन्मान घालवला आहे, जो माझ्या मनात त्यांच्याबद्दल होता. मला वाईट वाटते की मी कधीतरी त्यांची बाजू मांडली होती किंवा समर्थन केले होते.

सिमी गरेवाल यांच्या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तर दिल्ली सरकारकडून देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजूरी मिळाल्यानंतर कन्हैया कुमार यांनी म्हटले आहे की, दिल्ली सरकारने देशद्रोहाच्या केसची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. दिल्ली पोलीस आणि सरकारी वकिलांना विनंती आहे की, आता या केसला गांभिर्याने घ्यावे, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये स्पीडी ट्रायल व्हावी आणि टीव्हीवाल्या आप की अदालत ऐवजी कायद्याच्या न्यायालयात निर्णय द्यावा. विजय शेवटी सत्याचाच होतो.

कन्हैयाने पुढे म्हटले की, देशद्रोहाच्या केसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट आणि त्वरित कारवाईची जरूरत यासाठी आहे की, देशाला समजावे की, कशाप्रकारे देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर राजकारणासाठी केला जात आहे. तसेच राजकीय लाभ, मुख्य मुद्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी केला जात आहे. आम्ही निदोष आहोत, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्ही मोठ्या कालावधीपासून खोट्या आरोपांना तोंड देत आहोत. मीडिया ट्रायलसुद्धा सुरू आहे. शेवटी सत्य समोर येईल.