‘मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन’ : कन्हैया कुमार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बिहार विधानसभेला काही कालावधी शिल्लक आहे. असं असलं तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार ( kanhaiya kumar) मैदानात उतरले आहेत. कन्हैया कुमार ( kanhaiya kumar) यांनी आपला गृहजिल्हा बेगूसराय येथून आपल्या निवडक अभियानाची सुरुवात केली आहे. या दरम्यान कन्हैया कुमार यांचा एक व्हिडीओ सोशलवर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यात त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मला सतत देशद्रोही म्हणत असाल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन असंही कन्हैया कुमार म्हणाले आहेत.

सोमवारी बेगुसराय जिल्ह्यातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सुर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचं नामांकन भरताना कन्हैया कुमार उपस्थित होते. नामांकनानंतर कन्हैया कुमार यांनी आयोजित सभेत भाजपवर हल्लाबोल करत जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते. आता तर भाजपचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत.”

‘मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन’

कन्हैया कुमार म्हणाले, “ज्योतिरादित्य शिंदे हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते अतिशय वाईट व्यक्ती होते. त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हापासून ते भाजपचे झाले. मी एके ठिकाणी बोललो आहे की, मला जर तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणाल तर मी बोलेन की, खबरदार जर जास्त बोललात तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन. ज्यांना हे शिव्या देतात ते 5 मिनिटांनंतर काका म्हणायला सुरुवात करतात.” असंही कन्हैया म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओदेखील सोशलवर व्हायरल झाला होता.