कन्हैय्याकुमार निवडून येणार का ? ; बेगुसरायच्या निकालाकडे देशाचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाईन – जेएनयू प्रकरणात देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार बेगुसराय लोकसभा मतदारसंघातुन सीपीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येथे भाजपकडून केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह आणि राजदकडून तन्वीर हसन निवडणूक लढवत आहेत. सुरवातीला कन्हैय्याकुमारला महाआघाडीकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती पण गेल्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळवणारे राजदचे तन्वीर हसन मैदानात उतरल्यामुळे कन्हैय्याला महाआघाडीकडून तिकीट मिळू शकले नाही. त्यामुळे या मतदारसंघात सुरवातीला तिहेरी सामना पहायला मिळाला.

प्रचाराच्या शेवटच्या टप्यात मात्र कन्हैय्याकुमारने आघाडी घेतल्यामुळे तन्वीर हसन पिछाडीवर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आता कन्हैय्याकुमार आणि गिरिराजसिंह यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. तन्वीर हसन आणि कन्हैय्याकुमार यांच्यात होणाऱ्या मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फायदा गिरिराजसिंह यांना मिळेल. अभिनेत्री स्वरा भास्कर, शबाना आझमी, गीतकार जावेद अख्तर, अभिनेता प्रकाश राज, कॉमेडीयन कुणाल कामरा या सेलिब्रिटींनी कन्हैय्याकुमारसाठी प्रचार केला. कन्हैय्याकुमारने राजदचे तन्वीर हसन यांच्यावर टीका करण्याचे टाळून गिरिराजसिंह यांना लक्ष केले. कन्हैय्याकुमार कडून गिरीराजसिंह बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार करण्यात आला तर गिरीराजसिंहाच्या समर्थकांकडून कन्हैय्याकुमार देशद्रोही असल्याचा प्रचार करण्यात आला. एबीपी नेल्सनच्या सर्वेनुसार, कन्हैय्याकुमारला पराभवाला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जेएनयू प्रकरणानंतर कन्हैय्याकुमार हा भाजपविरोधी चेहरा म्हणून पुढे आला. देशभर त्याने भाषणे देऊन भाजप विऱोधी प्रचार केला. तसेच त्याने सातत्याने नरेंद्र मोदी यांना देखील लक्ष केले त्यामुळे कन्हैय्याकुमार निवडून येणार की नाही याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले.