पुरोगामी महाराष्ट्रात उच्चशिक्षित मुलीच्या कौमार्य चाचणीनंतर, कंजारभाट समाजातील १५ वर्षाच्या मुलीचे लग्न 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातल्या उच्च शिक्षित कुटुंबातील एका वधूला कौमार्य चाचणीला सामोरे जावे लागले असल्याची घटना ताजी असताना आता कोल्हापुरात देखील या समाजातील एका कुटुंबाने चक्क १५ वर्षीय मुलीचे लग्न लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या समाजातल्या अनिष्ठ रूढी आणि परंपरामुळे या समाजात जन्म घेणाऱ्या मुलींवर मोठा अन्याय होतोय असेच म्हणावे लागेल. मुलीचे लग्नाचे वय हे १८ पूर्ण असणे आवश्यक आहे. १८ वर्षांखालील मुलींचे अशा प्रकारे लग्न लावून देणे हा गुन्हा आहे हे माहित असून देखील या समाजात १५ वर्षीय मुलीचे लग्न लावून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
कोल्हापुरात कंजारभाट समाजातील एका १५ वर्षीय मुलीचे लग्न लावून दिले जात होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांना या प्रकरणाची कुणकुण लागली. त्यानंतर त्यांनी पोलीस आणि बालकल्याण संकुल यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला पाहिला त्यावर १२ जून २००३ अशी जन्मतारीख आहे. त्यावरून मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे हे लक्षात आले, असे असताना देखील मुलीच्या कुटुंबीयांनी तिला १८ वर्षे पूर्ण झाल्याचा दावा केला.
आमच्या समाजात बारा वर्षांच्या मुलींचीदेखील लग्न होत
हे प्रकरण पोलिसांपर्यत गेल्यानंतर हा विवाह थांबेल असे वाटले पण मुलीच्या नातेवाईकांनी मुलीला १८ वर्ष पूर्ण झाल्याचं खोटं सांगून घरी नेले. कुटुंबीयांनी हा विवाह सोहळा पूर्ण केल्याचं कळताच कोल्हापूर बालकल्याण संकुल समितीने मुलीला आपल्या ताब्यात ठेवलं. यावर ‘मुलीचं लग्नच झालेलं नाही, मग तिला बालकल्याण संकुलात का ठेवलं ?’ असा उलट जाब विचारण्यासाठी कंजारभाट समाजातील अनेक जण बालसंकुलाच्या परिसरात दाखल झाले. यावेळी मुलीच्या आईनंतर चक्क आमच्या समाजात बारा वर्षांच्या मुलींचीदेखील लग्न होत असल्याचे सांगून मुलीचा विवाह झाल्याचा निर्वाळाच दिला. दरम्यान पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
कंजारभाट समाजातील या अनिष्ट रुढी मुलींच्या जीवावरच उठल्या आहेत त्या ताबडतोब बंद केल्या पाहिजेत  असे  मत समाजातील सर्व स्तरातून व्यक्त केले जात आहे. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने ही गोष्ट पुढे आली नाही तर या मुलीला देखील इतक्या कोवळ्या वयात कौमार्य चाचणी सारख्या क्रूर प्रथेला  देखील सामोरे जावे लागले असते. विशेष म्हणजे मुलीच्या कुटुंबातील व्यक्तीचा या समाजातील क्रूर प्रार्थना मानतात. त्यामुळे मुलींना त्यांच्या घरातूनच  पाठिंबा मिळत नाही.
कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीची क्रौर्य…
लग्न लागल्यानंतर या जोडप्याला लॉजवर एका खोलीत नेलं जातं. बाहेर पंच थांबतात. मुलीच्या अंगावरील दागिने, केसांच्या पिना काढून घेतल्या जातात. ठरवून दिलेल्या वेळेमध्ये या जोडप्याने शरीरसंबंध प्रस्थापित करून पंचानी दिलेल्या पांढऱ्या चादरीवर रक्ताचा डाग बाहेर आणून दाखवायचा. जर तो नसेल तर ‘माल खराब निघाला’, असं म्हणत त्या मुलीची जाहीर नालस्ती केली जाते. हे कुणामुळे झालं, असं विचारून तिच्याकडून मुलाचे नाव वदवून घेतलं जातं. खेळामुळे, व्यायामामुळे, दगदग झाल्यामुळे वा इतर कोणत्याही कारणांमुळे असं होऊ शकतं, हा विचारच इथे केला जात नाही. आता संसार मोडणार, मार पडणार या भीतीने या मुली अनेकदा ‘बाहेरचा’ असं सांगून मोकळ्या होतात. समाजातल्या कुणा मुलाचं नाव घेतलं तर त्याला पंचाच्या पुढे आणून उभं केलं जातं, दंड भरावा लागतो, शिवाय या मुलीला मारहाणही केली जाते. मुलीला मारल्यानंतर जर नवऱ्याने नांदवायला नकार दिला, तर त्या मुलीचं आयुष्य पणाला लागतं. मुलगी नांदली तरी लग्नापूर्वी कुणाशी तरी शरीरसंबध होते, ही बोच त्या मुलाच्या मनात कायम राहते. वर्षोनुवर्षे त्यावरून वाद झडत राहतात. मात्र या सगळ्यातून कुणाचाही खासगीपणाचा अधिकार जपला जात नाही, हे जातपंचायतीला कबूलच नाही.
२१ व्या शतकतही स्त्री जन्माची परीक्षाच
शिक्षण, रोजगाराच्या संधीपासून वर्षोनुवर्षे दूर असलेला हा कंजारभाट समाज. राज्यात या समाजाची तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या. पूर्वी समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळालं नाही. म्हणून वेशीवरचं जगणं वाट्याला आलं. उदरनिर्वाहासाठी भटकत असताना गटातल्या स्त्रीला बंधनात ठेवण्यासाठी उतारा शोधला तो कौमार्य चाचणीचा.  ही चाचणी करण्याची पद्धतही कुणाही संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करणारी आहे.