युवतीची आत्महत्या; भिंतीवर रक्ताने लिहिले SORRY

कन्नड : पोलीसनामा ऑनलाइन – येथील बसस्टँड परिसरातील रामकृष्णमहल हॉटेलमधील एक खोलीत २२ वर्षीय युवतीने पंख्याला गळफास घेऊन केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि. २९) घडली असून अंजली अविनाश केदार असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरा एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिध्दार्थ कॉलनीतील अंजली अविनाश केदार या युवतीने बसस्टँड परिसरातील रामकृष्णमहल हॉटेलमधील खोली नं १०९ मध्ये छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने उजव्या हातावर ब्लेडने वार केलेले व भिंतीवर रक्ताने सॉरी लिहीलेले आढळून आले. सोमवारी सायंकाळी ५ ते मंगळवार सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हॉटेलचे मॅनेजर प्रकाश सोनवणे यांनी हॉटेलमध्ये आत्महत्या झाल्याचे शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली.

दरम्यान, रात्री उशिरा मयत युवतीची काकू ज्योती केदार (रा. शेंद्राबन औरंगाबाद) यांनी अंधानेर येथील बिअर बार मालक राम वाघुळे याने अंजलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याचबरोबर तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी राम वाघुळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव जाधव करत आहेत.