Kanpur Encounter : ‘या’ भयानक ‘कट’ प्रकरणात खरोखर सामील होती का नवविवाहिता ? 3 दिवसांच्या आत होईल ‘खुलासा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिकरू एन्काऊंटर मध्ये कट रचल्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठविलेली नवविवाहिता खुशी (अमर दुबे यांची पत्नी) च्या भूमिकेचा पुन्हा तपास सुरू झाला आहे. या प्रकरणी आयजी रेंज मोहित अग्रवाल यांनी एसएसपीला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. चौकशीनंतर तिची तुरूंगातून सुटका होण्याची अपेक्षा आहे.

एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या अमर दुबेची पत्नी खुशीला कट रचल्याबद्दल पोलिसांनी तुरूंगात पाठवलं आहे. 29 जून रोजी तिचे लग्न झाले होते आणि 30 जून रोजी ती बिकारू येथे पोहोचली होती. याच्या दोन दिवसांनंतरच 2 जुलै रोजी बिकरू येथे घटना घडली. ती दोन दिवसच बिकरूमध्ये राहिली तरीही पोलिसांनी कट रचल्याच्या आरोपावरून तिला तुरूंगात पाठविले. आता आयजीचे म्हणणे आहे की खुशीच्या भूमिकेचा आढावा घेतला जात आहे. पुरावा न मिळाल्यास 169 ची कारवाई करून तिला तुरूंगातून सोडण्यात येईल. तीन दिवसांत तपास पूर्ण होईल. तपास एसपी वेस्टकडे देण्यात आला आहे.

बिकरू येथे शहीद झालेल्या पोलिसांचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली. एकापाठोपाठ पाच चकमकी झाल्या. त्याचवेळी चकमकीत मारल्या गेलेल्या अमर दुबेच्या नवविवाहितेविरूद्ध पोलिसांच्या कारवाईवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. नातेवाईकांनी आरोप केला आहे की अमर बरोबर त्यांच्या मुलीचे लग्न त्यांची दिशाभूल करुन लावण्यात आले होते.

लग्नानंतर दोन दिवसांनंतर मुलीला सासरच्यांबद्दल नीट समजले देखील नव्हते की पोलिसांनी तिला या एन्काऊंटर कट रचल्याप्रकरणी अटक केली. निर्दोष मुलीविरूद्ध केलेल्या कारवाईमुळे कुटुंबातील लोक अतिशय दुःखी स्थितीत होते. पनकी रतनपूर कॉलनीत राहणारे खुशी दुबेचे वडील श्याम यांनी सांगितले की, ते पेंटिंगचे काम करून कसेतरी पाच मुलांच्या कुटुंबाचे पालनपोषण करतात.