कानपुर शूटआऊट : चकमकीत ठार झालेल्या अमर दुबेचे 29 जूनला झाले होते लग्न, आजी म्हणाली – ‘कुटुंबउध्वस्त केलं’

कानपुर : वृत्त संस्था – हमीरपुरच्या मौदहामध्ये युपी एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेला हिस्ट्रीशीटर अमर दुबेचे काही दिवसापूर्वीच लग्न झाले होते. विकास दुबेचा तो अत्यंत जवळचा होता. अमर दुबेचे लग्न 29 जून 2020 ला झाले आणि 2 जुलैच्या रात्री विकरू गावात त्याने विकास दुबेसोबत मिळून पोलीस पथकावर हल्ला केला. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते, अन्य 7 जण जखमी झाले होते. अमर दुबेचा खात्मा झाल्याने परिसरात शांतता दिसून येत आहे. नववधूच्या हातावरील मेहंदीचा रंग कमी झालेला नसतानाच तिचे कुंकू पुसले गेले आहे. अमरची आजी रडून-रडून बेजार झाली आहे.

एका न्यूज चॅनलशी बोलताना अमर दुबेची आजी सर्वेश्वरी दुबेने म्हटले की, विकास दुबेने आमचे कुटुंब उध्वस्त केले. अमर दुबे आणि अतुल दुबे त्याच्यापासून वेगळे राहात होते. आत्ताच 29 जूनला लग्न झाले होते. मात्र अमर आणि अतुल आम्हाला काही सांगत नव्हते, पण घरातील या मुलाच्या मृत्यूचे दुख तर आहेच.

25 हजाराचे बक्षीस होते अमर दुबेवर
8 पोलीस कर्मचार्‍यांच्या हत्येच्या प्रकरणात फरार असलेल्या अमर दुबेवर पोलिसांनी 25 हजाराचे बक्षीस लावले होते. तो विकास दुबेचा उजवा होत होता आणि त्या रात्री झालेल्या गोळीबारात सहभागी होता. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता युपी एसटीएफने अमर दुबेचे एन्काऊंटर केले. अमर मौदहामध्ये आपल्या एका जवळच्या नातेवाईकाच्या घरी लपण्यासाठी निघाला होता.

तत्पूर्वी तो फरीदाबादमध्ये लपला होता, परंतु युपी एसटीएफला घाबरून तो मौदहाला पळाला. त्याचा पाठलाग करणार्‍या एसटीएफने जेव्हा त्यास घेरले तेव्हा त्याने पिस्तुलातून फायरिंग सुरू केली. उत्तरदाखल पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये अमर दुबे ठार झाला. चकमकीत इन्स्पेक्टर मौदहा मनोज शुक्ला आणि एका एसटीएफच्या कर्मचार्‍यालाही गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत.