मृत्यूच्या 2 दिवसांनंतर देखील हॉस्पीटलमधून येत होतं महिलेच्या ऑक्सिजन लेव्हलचं अपडेट, जाणून घ्या कारण

कानपुर : वृत्त संस्था – कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत हॉस्पिटल्सच्या बेजबाबदारपणाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. खासगी हॉस्पिटल तर माणुसकीच विसरली आहेत, परंतु सरकारी हॉस्पिटलसुद्धा असाच खेळ खेळत असल्याचे दिसत आहे. निष्काळजीपणाची हद्द योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातील कानपुरच्या सरकारी हॅलट हॉस्पिटलमध्ये पहायला मिळाली. येथे 2 दिवसांपूर्वी मेलेल्या महिलेची स्थिती हॉस्पिटल प्रशासन तिच्या कुटुंबियांना सांगत होते.

महिलेवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सुद्धा तिची ऑक्सीजन लेव्हल आणि इतर डिटेल हॉस्पिटल प्रशासन नातवाईकाच्या मोबाईलवर पाठवत राहिले. कानपुरच्या गीता नगरमध्ये राहणारी ज्येष्ठ महिला कोरोना संक्रमित झाली होती. 13 मे रोजी त्यांना उपचारासाठी हॅलट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, ज्यानंतर कुटुंबियांना एकदाही त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली नाही. कुटुंबियांच्या माहितीनुसार ज्येष्ठ महिला प्रियदर्शनी शुक्ला यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती आणि त्यांची स्थिती सतत बिघडत चालली होती, परंतु त्यांना साधारण ऑक्सीजन बेडवरच ठेवण्यात आले.

यामुळे 16 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. 18 मे पर्यंत त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या स्थितीची माहिती मोबाइलवर पााठवली जात होती, ज्यामध्ये त्यांची ऑक्सीजन लेव्हल आणि पल्स रेट सांगितला जात होता. मृत महिलेची सून प्राची शुक्ला यांचे म्हणणे आहे की, सासूला हॅलट हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळाले नाहीत यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हैराण करणारी बाब ही आहे की, त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर सुद्धा त्यांची ऑक्सजीन लेव्हल मोबाइलवर मेसेज करून पाठवली जात होती.

त्यांनी हॅलट हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले आहेत. रूग्णाच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याच्या प्रकृतीची माहिती देणारे मेसेज पाठवल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. आता चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.