8 पोलिसांचा ‘मारेकरी’ विकास दुबेच्या ‘खबरी’वर कारवाई, चौबेपूर पोलीस ठाण्यातील निलंबित अधिकाऱ्याला अटक

कानपुर : वृत्तसंस्था – पाच लाखांचे बक्षीस असलेल्या विकास दुबेला मदत केल्याच्या आरोपावरून बुधवारी (दि.8) दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चौबेबूर पोलीस ठाण्यातील निलंबित स्टेशन अधिकारी विनय तिवारी आणि बीट प्रभारी केके शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपासून विनय तिवारीची एसटीएफकडून कसून चौकशी सुरु होती त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. परंतु आताच्या ताज्या माहितीनुसार त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांची माहिती दिल्याचा संशय विनय तिवारी याच्यावर होता. यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी विनय तिवारी व्यतिरिक्त तत्कालीन बीट प्रभारी केके शर्मा यांच्याकडे देखील चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. केके शर्मावर देखील खबरी असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पोलिसांकडून विकास दुबे याच्या खबऱ्याचे फोन रेकॉर्ड तपासत असून या प्रकरणात संपूर्ण चौबेपूर पोलीस ठाणे संशयाच्या भोवऱ्यात आहे. महत्वाचे म्हणजे शहीद सीओ देवेंद्र मीश्रा यांचे कथित पत्र सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी तत्कालीन एसओ विनय तिवारी आणि विकास दुबे यांच्यात संगनमत असल्याची तक्रार तत्कालीन वरीष्ठ पोलीस अधीक्षक अनंद देव यांच्याकडे केली होती. शहीद सीओंच्या व्हायरल पत्रा नंतर खबरी असल्याच्या संशयाची सुई विनय तिवारी यांच्याकडे गेली. ज्यावेळी पोलिसांचे पथक बकरूला येथे जात होते, त्यावेळी तिवारी याने फोन करून लाईट कट केली. अनेक आरोपानंतर विनय तिवारी याला निलंबित करण्यात आले. यानंतर चौबेपूर पोलीस ठाण्यातील दोन हवालदार आणि एका शिपाया निलंबित करण्यात आले. या सर्वांची चौकशी केली जात आहे.

शहीद देवेंद्र मिश्रा यांनी पत्रात काय लिहिले
शहीद देवेंद्र मिश्रा यांनी आपल्या कथित पत्रात लिहले होते की, विकास दुबे याच्यावर जवळपास दीडशे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 13 मार्च रोजी याच विकास दुबे याच्याविरुद्ध चौबेपूर पोलीस ठाण्यात भादवी 386 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये दहा वर्षा पर्यंतची शिक्षेची तरतूद असून हा अजामीनपात्र गुन्हा आहे. मिश्रा यांनी लिहले आहे की, अजामीनपात्र गुन्हा असूनही 24 तासपर्यंत विकास दुबे याच्याविरुद्ध कारवाई केली गेली नाही तसेच त्याला अटकही केली गेली नाही. तेव्हा 14 मार्च रोजी त्यांनी गुन्ह्यातील प्रगतीबाबत विचारणा केली. यावेळी त्यांना समजले की चौबेपूर येथील स्टेशन अधिकारी विनय कुमार तिवारी यांनी एफआयआर मधून 386 कलम काढून टाकले आहे आणि किरकोळ कलम लावले आहे. या पत्रामध्ये शहीद मिश्रा यांनी स्पष्टपणे लिहले आहे की स्टेशन अधिकारी विनय तिवारीचे आणि विकास दुबे याचे येणे जाणे होते आणि ते एकमेकांच्या संपर्कात होते. एवढेच नाही तर सीओंनी चार महिन्यापूर्वीच इशारा दिला होता की, चौबेपूर स्टेशन अधिकाऱ्यांनी वेळीच कामाची पद्धत बदलली नाही तर येत्या काळात गंभीर घटना घडू शकते, असा इशारा दिला होता.