धक्कादायक ! चहा विकणार्‍या तरूणाने लावला बँकेला करोडोंचा चूना

कानपूर : वृत्तसंस्था – बँकेला चूना लावून ग्राहकांचे कोट्यवधी रुपये लंपास केल्याची घटना काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये घडली आहे. बँक ऑफ इंडियाच्या महाराजपूर शाखेमध्ये दीड कोटींच्या घोटाळाप्रकरणी पोलिसांनी रोजंदारीवर काम करणार्‍या मजुराला अटक केली आहे. भामट्यांनी ग्राहकांच्या खात्यातून एक कोटी 41 लाख रुपये लंपास केले होते. पंकज गुप्ता असे या मजुराचे नाव आहे.

आरोपी पंकज गुप्ताने बँक कर्मचार्‍यांचा पासवर्ड चोरला आणि ही रक्कम त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या खात्यात ट्रान्सफर केली होती. महाराजपूर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या खटल्याचा तपास अनेक महिने लांबला. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानंतर 3 दिवसापूर्वी हे प्रकरण नरवलचे इन्स्पेक्टर राम अवतार यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर त्यांनी सूत्र हलवून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.

चौकशीत पंकजचे वडील पोलीस स्टेशनसमोर चहाचे दुकान चालवत होते. त्याठिकाणी पंकजही काम करीत होता. ते 20 वर्षांपूर्वी फतेहपूरमधून हाथीपूरमध्ये वास्तव्यास आले होते. पाच रुपयांची नोकरी करणारा पंकज वर्षभरात मालामाल झाला होता. सायकल ऐवजी कार चालवू लागल्याने तो संशयाच्या फेर्‍यात अडकला होता.