भाजपाचे नेते कपिल मिश्रांचं प्रक्षोभक भाषण प्रकरण पोहचलं सुप्रीम कोर्टात, बुधवारी सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप नेते कपिल मिश्रा सह अन्य नेत्यांनी केलेल्या भडकावू भाषणाचा मामला आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट बुधवारी सुनावणी घेणार आहे.

दिल्लीतील हिंसाचार आता बंद झाला असला तरी या दंगली भडकण्यास कारणीभूत ठरलेले व भडकावू भाषण देणारे कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा यांच्यावर दिल्ली पोलिसांनी अद्याप काहीही कारवाई केलेली नाही.

अ‍ॅड. कॉलिन गोंजाल्विस यांनी मुख्य न्यायमूर्ती एस ए बोबडे यांना सांगितले की, हर्ष मंदर आणि अन्य पाच पिडितांकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये दिल्ली हायकोर्टमध्ये यावर १३ एप्रिलपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्याला या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने सुनावणी होणे गरजेचे आहे.

यावर न्या. बोबडे यांनी आम्ही शांततेची अपेक्षा करतो. आम्ही असे विषय रोखून धरु शकत नाही. कोर्ट सुनावणीनंतरच परिस्थितीशी सामना करता येईल, असे सांगितले.

कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, परवेश वर्मा व इतरांविरोधात तत्काळ एफआयआर दाखल करावे. या दंगलीची चौकशी करण्यासाठी दिल्लीच्या बाहेरच्या अधिकार्‍यांची एसआयटी स्थापन केली जावी, अशी मागणी याचिकाकर्तांनी केली आहे.