प्रिती गांधींच्या ट्विटनंतर कपिल सिब्बल यांची फेसबुक पोस्ट ‘डिलीट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. परंतु या बैठकीला आता वादळी स्वरुप प्राप्त झाले आहे. भाजपला मदत करण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नवी आझाद यांनी तर थेट राजीनामा देण्याची धमकी दिली तर कपील सिब्बल यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. काही नेते भाजपला मदत करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यानंतर गुलाम नबी आझाद यांनी भाजपला मदत करण्याचे सिद्ध झाले तर पदाचा राजीनामा देईन, असं ठणकावून सांगितलं. तर कपिल सिब्बल यांनी केलेले त्यांचे ट्विट काही वेळातच डिलिट केलं.

भाजपसोबत हातमिळवणी करुन सोनिया गांधींना पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं पत्र लिहिण्यात आल्याचा आतिशय गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांना माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि गुलाब नबी आझाद यांनी अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. कपिल सिब्बल यांनी ट्विट व फेसबुकवरुन राहुल गांधी यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. आम्ही भाजपाशी संगनमत केलंय असं राहुल गांधी म्हणतात. राज्यस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणीपूरमध्ये भाजप सरकार विरोधात पक्षाची बाजू मांडली. गेल्या तीस वर्षात भाजपच्या पथ्यावर पडेल, असं एकही काम केलं नाही. तरी आम्ही भाजपची हातमिळवणी केल्याचे म्हटलं जात आहे, अशा शब्दांत सिब्बल यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. मात्र, काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. पण फेसबुकवरील पोस्ट तशीच होती.

भाजपच्या सोशल मीडियाच्या राष्ट्रीय निरीक्षक प्रिती गांधी यांनी आपल्या ट्विटरवरुन सिब्बल यांची फेसबुक पोस्ट शेअर केली. त्यासोबत सिब्बल यांनी ट्विट डिलीट केलं, पण फेसबुक पोस्ट तशीच आहे, असे म्हटले. प्रिती गांधी यांच्या ट्विटनंतर सिब्बल यांनी काही वेळातच फेसबुक पोस्टही डिलीट केली.त्यांनी आपली पहिली पोस्ट डिलीट करुन दुसरी नवीन पोस्ट शेअर केली. यामध्ये राहुल गांधीं यांच्याशी माझं व्यक्तीगत बोलणं झालं नाही, ते तसं काहीही बोलले नाहीत. त्यामुळे मी माझे ट्विट मागे घेत असल्याचे सिब्बल यांनी म्हटलं. तशीच पोस्ट त्यांनी फेसबुकवर देखील केली आहे.