कराड : 15 हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

कराड : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याने शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी 15 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती 5 हजारांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारल्यानंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली.

राहुल अशोक सोनावले (वय 38, रा. गजानन हौसिंग सोसायटी, ता. कराड) असे कारवाई करण्यात आलेल्या संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे शेतीपंपासाठी तीन एचपीचे नवीन वीज कनेक्शन मिळावे, यासाठी अर्ज केला होता. ते कनेक्शन देण्यासाठी राहुल सोनावले याने तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती 5 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत कार्यालयात जाऊन याबाबतची माहिती दिली. या माहितीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथक तयार केले. या पथकाची खात्री झाल्यानंतर सापळा रचला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाठार येथे पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी राहुल सोनावले याच्यावर कारवाई केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश जगताप, संभाजी काटकर, अरिफा मुल्ला, विनोद राजे, तुषार भोसले, निलेश येवले, प्रशांत ताटे यांनी ही कारवाई केली.