Satara News : पैसे थकीत ठेवल्यानं कर्‍हाडातील जमिनी होणार सरकार जमा

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्‍यातील अनेकांना अवैध वाळू, मुरूम, माती यासह गौणखनीज उत्खनन प्रकरणी दंड झाला आहे. मात्र, त्यातील अनेकांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्या सातबारावर बोजा चढला. दरम्यान, त्यांनी तो दंडच भरलाच नाही. त्यांची जमीन सरकारजमा करण्याच्या नोटिसा तहसीलदारांनी दिल्या आहेत. त्यानंतरही दंड न भरल्याने एक कोटी ४६ लाख ६६ हजार २७५ रुपयांच्या वसुलीप्रकरणी तालुक्‍यातील २१ जणांची जमीन सरकारजमा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्‍यातील ८५ जणांच्या सातबारावर चार कोटी ५५ लाख सात हजार ३६० रुपयांचा बोजा चढवला आहे. त्यांच्या सातबारावर संबंधित दंडाचा बोजा चढवल्यानंतरही त्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यांना ती जमीन सरकारजमा करण्याची नोटीस तहसीलदार यांनी पाठवली होती. मात्र, तरीही २१ जणांनी मुदतीत एक कोटी ४६ लाख ६६ हजार २७५ रुपयांचा दंड न भरल्याने त्यांची जमीन सरकारजमा करण्याचे आदेश दिले आहेत. कृष्णा नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या, साठा करणाऱ्या आणि अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांना तहसील कार्यालयाने दंड केला होता. त्याचबरोबर अवैधरीत्या मुरूम, मातीचेही उत्खनन, वाहतूक केली जाते. त्या प्रकरणीही दंड करण्यात आला आहे. मात्र, अनेकांनी दंड भरलाच नाही. त्यामुळे त्यांच्या सातबारावर बोजाही चढवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

तहसीलदारांच्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले
किरण पाटील (येरवळे), विक्रम शिंदे (ओंड), अधिक सावंत (ओंडोशी), शंकरराव थोरात (कार्वे), संदीप बोराटे (शिरवडे), दत्तात्रय माने (मालखेड), संग्राम थोरात (शिरवडे), निवास बाबासाहेब थोरात (शिरवडे), नीलेश जगदाळे (शिरवडे), सुनील जगदाळे (शिरवडे), दादासो डुबल (शिरवडे), आनंदा थोरात व आण्णासाहेब थोरात (शिरवडे), प्रमोदसिंह जगदाळे व हिंदुराव जगदाळे (शिरवडे), प्रवीण पिसाळ (नडशी), रामचंद्र ऊर्फ चंद्रकांत थोरात (नडशी), रवींद्र थोरात (नडशी), संजय थोरवडे (वारुंजी), सुवर्णा खालकर व चार (खालकरवाडी), विनायक पवार (बामणवाडी) व उत्तम देसाई (बामणवाडी) यांचा त्यामध्ये समावेश असल्याचे तहसीलदार वाकडे यांनी सांगितले.