पंढरपुरात कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांची हत्या

पंढरपूर/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर येथील कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांचा खून करण्यात आला आहे. बाजीराव जगताप यांनी हा खून केला असून मठाधिपतीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिली आहे. पंढरपूर येथे राज्यातील अनेक महाराजांचे मठ आहेत. यातील एक कराड येथील कराडकर महाराज मठामध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चाकूने सपासप वार करत हा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जयवंत पिसाळ कराडकर महाराज मठाचे अधिपती होते. मात्र, या मठाच्या मठाधिपतीचा वाद होता. आज कराडकर महाराज मठात एक मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मठात आढळलेला मृतदेह जयवंत पिसाळ यांचा असल्याचे समोर आले. जयवंत पिसाळ आणि बाजीराव जगताप यांच्यामध्ये मठाधिपतीवरुन वाद होते, अशी माहिती मिळत आहे. यावरुनच बाजीराव जगताप याने पिसाळ यांच्यावर चाकूने वार करून खून केला.

पोलिसांनी बाजीराव जगताप याला ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान जगताप याने गुन्ह्याची कबुली दिली. जगताप याने यापूर्वी कराडमध्ये एकजणाच्या डोक्यात वीणा घातला होता.पोलिसांनी बाजीराव जगताप विरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पंढरपूर शहरामध्ये खळबळ उडाली असून मठाधिपती यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याची उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/