‘या संपूर्ण वादाला मी जबाबदार आहे’

मुंबई : वृत्तसंस्था – हार्दिक पांड्‍या आणि के. एल राहुल यांनी सेलेब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’ मध्‍ये महिलांवर केलेल्‍या आक्षेपार्ह वक्‍तव्‍यामुळे वाद निर्माण झाला होता. या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना टीम इंडियातून निलंबित करण्‍यात आले होते. आता हे प्रकरण कोर्टात गेले आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्‍याने हार्दिक आणि राहुलची अडचण आणखी वाढली आहे. दरम्‍यान, या शोचे निर्माते आणि अँकर करण जोहर यांनी मौन साधले होते. परंतु आता याबाबत  करण जोहरने एका वाहिनीशी वक्तव्य करत या प्रकरणावरील मौन सोडलं आहे. करणने याचं स्पष्टीकरण देत माफीही मागितली आहे.
एका वाहिनीशी बोलताना करण म्हणाला की, “या संपूर्ण वादाला मी जबाबदार आहे. कारण हा माझा शो आहे आणि व्‍यासपीठही माझे आहे. मी त्‍या दोघांना (हार्दिक पांड्या आणि के. एल राहुल) शोमध्‍ये गेस्ट म्‍हणून बोलावले होते. या वादामुळे जे काही घडले, त्‍याला मी जबाबदार आहे. त्‍यामुळे मी अनेक रात्री झोपलेलो नाही. मी विचार करत राहिलो की, या नुकसानीची भरपाई कशी करू शकेन.”
इतकेच नाही तर करण पुढे असंही म्‍हणाला, “जर मी कुठलेही वक्‍तव्‍य केले असेल तर मी बचावाची भूमिका घेणार नाही. मी त्‍या मित्रांना जे प्रश्‍न विचारले ते महिलांनाही विचारतो. ज्‍यावेळी दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट आली होती, त्‍यावेळीही मी त्‍यांना हाच प्रश्‍न विचारला होता. माझे त्‍या प्रश्‍नांवर कुठलेही नियंत्रण नाही.”
मुख्य म्हणजे बोर्डाने हार्दिक आणि राहुल विरोधात जी कारवाई केली, त्‍यावरही करणने भाष्य केलं. यावर बोलताना करण म्हणाला की, “त्‍यांच्‍यासोबत जे काही झाले, त्‍याचे मला दु:ख आहे. लोक म्‍हणत आहेत की, मी हे सर्व टीआरपीसाठी केले आहे. परंतु, मी एक गोष्‍ट सांगू इच्‍छितो की, मी टीआरपीची चिंता करत नाही.”