करण ससाणे काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

विखे समर्थक अण्णासाहेब शेलार यांना डच्चू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विखे समर्थक मानल्या जाणाऱ्या जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना काँग्रेस पक्षाने डच्चू देऊन जिल्हाध्यक्ष पदावर करण जयंत ससाणे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खा. के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

ससाणे हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे महासचिव आहेत. प्रभारी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. डॉ. सुजय विखे यांच्या मुंबई प्रवेशादरम्यान शेलार यांचे कार्यकर्ते मुंबईत उपस्थित होते. डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेत्यांनी पक्षाच्या बाजूने जाहीर मतप्रदर्शन करून विखे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र जिल्हाध्यक्ष शेलार यांनी मतप्रदर्शन केले नव्हते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शेलार हे विखे यांचाच प्रचार करणार, हे जवळपास निश्‍चित मानले जाऊ लागले होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिफारशीवरून युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस करण जयंत ससाणे यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय महासचिव खा. के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. ससाणे यांच्या नियुक्तीमुळे श्रीरामपूर येथील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. करण ससाणे यांचे वडील दिवंगत जयंत ससाणे हे श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार होते. तसेच शिर्डी साईबाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.

करण ससाणे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून समर्थक अण्णासाहेब शेलार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना हा मोठा झटका मानला जात आहे. डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांचे पिता राधाकृष्ण विखे पाटील यांनाही त्याचे परिणाम भोगायला सुरूवात झाली आहे.