मंत्रीमंडळ विस्तारामुळे कर्नाटकात सत्ताधारी गोटात धुसपूस 

बॅंगलोर :कर्नाटक वृत्तसंस्था – काँग्रेस आणि जनता दल यांच्यात आता नव्या धुसपूसीला सुरुवात झाली असून हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याला मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी विरोध दर्शविला आहे. कुमार स्वामी आणि आघाडीचे समन्वय समितीचे अध्यक्ष समिती अध्यक्ष सिद्धरामय्या यांच्यात कुमारकृपा अतिथीगृहामध्ये बैठक पार पडली त्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची बाब बोलून दाखवली तेव्हा कुमार स्वामी म्हणाले,  हिवाळी अधिवेशना अगोदर जर विस्तार केला तर सरकार अधिवेशनात मोठ्या पेचाला बळी पडेल.

भडकलेले ऊस दर आंदोलन अधिक भडकेल
सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर कुमार स्वामी सध्या उत्सुक नसल्याचे समजते. कारण राज्यात सध्या ऊसदर आंदोलनाचा भडका उडाला आहे. उसाच्या पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर मंत्रिमंडळ विस्तार केला गेला तर विरोधकांकडून याच मुद्द्यावर अधिवेशन काळात गदारोळ माजवला जाईल असे कुमार स्वामी यांना  वाटते आहे.

आघाडीतील गटबाजी रोखणे मुश्किलीचे
अधिवेशनाच्या तोंडावर जर मंत्रिमंडळ विस्तार केला तर जनता दल आणि काँग्रेसमध्ये असणाऱ्या नाराजांच्या गटाला भाजप कडून फूस लावण्यात येईल आणि अधिवेशनाच्या काळात सरकारला विधेयक मंजूर करून घेण्यास अडथळा निर्माण होईल म्हणून कुमार स्वामींनी मंत्रिमंडळ विस्तारा पासून दोन हात लांब राहणे पसंत केले आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला मकर संक्रांती नंतरचा मुहूर्त
मंत्री मंडळ विस्ताराला तब्ब्ल दोन महिन्याचा अवधी लागणार असल्याचे कुमार स्वामींच्या गोटात बोलले जाते आहे. नाराज व्यक्तींशी चर्चा करून नंतरच मंत्री मंडळात समाविष्ट  करण्यात येणाऱ्या आमदारांची यादी तयार केली जाईल असा सूर सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्री कुमार स्वामी यांच्यात झालेल्या बैठकीत उमठवला गेला आहे.

येत्या १० ते २० डिसेंबर रोजी बेळगाव येथे कर्नाटक विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. त्या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. राज्यातील ऊसदर आंदोलन तसेच बेरोजगारी आणि प्रशासनाची अकार्यक्षमता या मुद्द्यावर भाजप सरकारला घेरणार आहे. परंतु मंत्री मंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून आघाडी सरकार मध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.