कॅनॉलमध्ये कार पडून कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

भरधाव जाताना कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलाचा कठडा तोडून कॅनॉलमध्ये पडली. त्यात कराटे प्रशिक्षकाचा मृत्यु झाला. ही घटना फुरसुंगी येथील सोनार पुलावर पहाटे घडली. नितीन कुंभार असे त्याचे नाव आहे. ते लोणी काळभोर येथील एजंल हायस्कुल मध्ये कराटे प्रशिक्षक होते.

[amazon_link asins=’B01CZJH85I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e43561e1-9de7-11e8-a7b5-b114da6378f9′]

फुरसुंगी येथील कॅनॉलवरील रस्त्यावरुन काही जण व्यायाम करायला तेथे गेले होते. त्यांना सोनार पुलाचा कठडा तुटलेला दिसला. त्यांनी खाली वाकून पाण्यात पाहिले  तेव्हा त्यांना कॅनॉलमध्ये एक गाडीचा टप तरंगताना दिसला. त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली तोपर्यंत स्थानिक लोकांनी गाडी बाहेर काढली होती.

सोनार पुलावर काही जण व्यायाम करत असतात. सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना सोनार पुलाचा लोखंडी कठडा तुटलेला दिसला. त्यांनी खाली पाण्यात पाहिले तर त्यांना गाडीचा टप दिसून आला. त्यानंतर गावातील घुमे, पवार या तरुणांनी पाण्यात उतरुन गाडीला दोर बांधला व गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती न आल्याने गावातीलच क्रेन बोलावून तिच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. तोपर्यंत अग्निशामन दलाची गाडी आली होती.

नितीन कुंभार यांची गाडी कधी पाण्यात पडली हे कोणाच्या लक्षात आले नाही. गाडी पुढच्या बाजूने कॅनॉलमध्ये जाऊन पडल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांनी मागील सीटवर जाऊन तेथून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. परंतु, दरवाजा प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने उघडण्याचा  प्रयत्न केल्याने तो उघडू शकला नाही. त्यामुळे आतमध्येच त्यांचा मृत्यु झाला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

फुरसुंगी ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वीच येथील कामाबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यात या पुलाचे काम करण्याची मागणी केली होती.