अन् ‘त्या’ फोन कॉलवर दिलीपकुमार यांनी नवाज शरीफ यांना झापले होतं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजचा दिवस भारतीय लष्कर आणि देशासाठी अभिमानाचा आहे. 21 वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये तिरंगा फडकवला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 1999 साली भारताने ऑपरेशन विजय नावाने ही मोहीम राबवली होती. या ऑपरेशनमध्ये लष्कराचे 530 जवान हुतात्मा झाले होेते. सुमारे 1363 जवान जायबंदी झाले होते. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेत होते.

युद्धादरम्यान भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना फोन केला होता. त्यावेळी वाजपेयींबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार हे होते. वाजपेयींनी शरीफ यांचे दिलीपकुमार यांच्याशी फोनवर बोलणे घडवून आणले होते. प्रसंगाचा उल्लेख पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री खुर्शीद यांनी ‘नायदर अ हॉक नॉर अ डव’ पुस्तकात उल्लेख केला आहे. आम्ही लाहोरमध्ये मैत्रीचे आमंत्रण घेऊन आलो होतो. या बदल्यात तुम्ही आम्हाला कारगिल युद्ध दिले, अशी नाराजी वाजपेयींनी फोनवर व्यक्त केली होती.

हे ऐकताच नवाज शरीफही नि:शब्द झाले होते. त्यानंतर वाजपेयी म्हणाले, ‘जरा थांबा, एका साहेबांशी तुम्ही बोला.’ वाजपेयी यांनी दिलीपकुमार यांच्याकडे फोन दिला. नवाज यांच्याबरोबर फोनवर बोलण्यास सुरूवात केली. ‘मियां नवाज तुम्ही शांतीचे पुरस्कर्ते होता. तुमच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही ही परिस्थिती सुधारा’, असा सल्ला त्यांनी दिला होता. दिलीपकुमार यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे शरीफ यांनाही धक्का बसला होता. या युद्धामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमध्ये (एलओसीमध्ये) न घुसता भारतीय सैनिकांनी शत्रुंना पळवून लावले होते. या लढाईत पाकिस्तानचे सुमारे 3 हजार सैनिक मारले गेले होते. पण अधिकृतरित्या पाकिस्तानने हे कधीच मान्य केले नाही.