रोहित पवारांना राष्ट्रवादीमधूनच विरोध, अजित पवार समर्थक गुंड या देखील आमदारकीस ‘इच्छुक’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेची जोरदार तयारी करीत असताना त्यांना पक्षातून अंतर्गत विरोध होऊ लागला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड या मतदारसंघातून इच्छुक आहे. त्यांचा पवार यांना विरोध असल्यामुळे पवार यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना शह देण्यासाठी शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेच्या आखाड्यात उतरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. रोहित पवार सध्या कर्जत मुक्कामी असून त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र त्यांना पक्षातूनच अंतर्गत विरोध होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा गुंड या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत.

दुसरीकडे रोहित पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे राष्ट्रवादीकडून जवळपास निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मंजुषा गुंड या वेगळी राजकीय भूमिका घेऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पेचप्रसंगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. पवार यांना विरोध करणाऱ्या मंजुषा गुंड यांचे पती राजेंद्र गुंड हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे अजित पवार हे तर रोहित पवार यांना विरोध करत नाहीत ना, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Visit – policenama.com