विधानसभा 2019 : कर्जत-जामखेड मध्ये पालकमंत्री शिंदे यांच्या वर्चस्वाला बारामतीकरांचे ‘आव्हान’, लक्षवेधी लढत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन (सुशील थोरात) – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला थेट बारामतीच्या पवार कुटुंबातील रोहित पवार यांनी आव्हान दिले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून रोहित पवार हे या मतदारसंघातून विधानसभेची तयारी करीत आहेत. पवार कुटुंबियांच्या आव्हान पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे कसे परतवून लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात नगर जिल्ह्याच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Image result for ram shinde and rohit pawar

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची या मतदारसंघातून दुसरी टर्म आहे. आता तिसऱ्यांदा विजय होण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला काही कार्यकर्ते दुखावल्यानंतर त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर जोर दिला आहे. हा मतदारसंघ तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यापूर्वी मतदारसंघ राखीव असताना येथून भाजपचा उमेदवार निवडून जायचा. आता खुला झाल्यापासूनही दोन्ही वेळेस प्रा. राम शिंदे यांच्या रूपाने भाजपचाच उमेदवार विजयी झालेला आहे. भाजपचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी बारामतीच्या पवारांनी मतदारसंघाकडे लक्ष घातले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु दीड-दोन वर्षांपासून रोहित पवार यांनी मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. बारडगाव सुद्रिक येथील अंबालिका साखर कारखाना पवारांच्या बारामती ॲग्रोने घेतल्यापासून पवार कुटुंबीयांनी मतदारसंघात विकास कामे सुरू करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळात टँकरने पाणी पुरवले. साखर कारखान्यामुळे मतदारसंघातील शेतकरी आपल्या बाजूने राहतील, हे गृहीत धरून रोहित पवार हे या मतदारसंघातून लढत आहे. पवार यांनी शैक्षणिक संस्थाही सुरू केल्या आहेत. दुसरीकडे दोनदा आमदार झालेले पालकमंत्री राम शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. मात्र त्यांच्याकडे साखर कारखाना, दूध संस्था अथवा शैक्षणिक संस्था नाही. त्यामुळे त्यांना पराभूत करणे सोपे जाऊ शकते, असा पवार कुटुंबियांचा कयास आहे. मात्र पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून कुकडीच्या पाण्याच्या माध्यमातून मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपलेसे केले आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुकडी प्रकल्पातील चारींची कामे पूर्ण करून दुष्काळी जनतेला पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षभरापासून पालकमंत्री शिंदे व रोहित पवार यांच्यात रस्सीखेच चालू आहे. आता जशी-जशी निवडणूक जवळ येत आहे, तशी-तशी चुरस वाढली आहे. इतर पक्षांनी उमेदवार उभे केले, तरी खरी लढत शिंदे व पवार यांच्यातच राहणार आहे. वंचित बहुजन विकास आघाडीने अरुण जाधव यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. ते नेमकी कोणाची व किती मते खातात, याचा शिंदे व पवार यांच्या लढतीवर परिणाम होऊ शकताे.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यांना मानणारा मतदारसंघात मोठा समुदाय आहे. ते भाजपात जाणार आहेत. तसे झाल्यास त्याचा मोठा फटका रोहित पवार यांना बसू शकतो. तसेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती मोरे व त्यांच्या पतीने रामराम ठोकून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे. त्याचाही परिणाम शिंदे यांच्या मतावर होऊ शकतो. रोहित पवार व मंत्री शिंदे यांच्यातील लढतीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात नगर जिल्हा नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Visit : policenama.com