साध्वी प्रज्ञासिंहच्या वक्तव्यावर भाजपने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. साध्वी यांच्या वक्तव्यानंतर वादळ उठले असून सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. भाजपने मात्र ‘हे साध्वी यांचे वैयक्तिक मत आहे’, असे स्पष्ट करत हात झटकले आहेत.

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात तेंव्हाचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना वीरमण आले. असे असताना साध्वी प्रज्ञासिंहने करकरे यांच्या मृत्यूबाबत आज धक्कादायक विधान केले. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड त्रास दिला. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळे झाला असे वादग्रस्त वक्तव्य साध्वीने केले. त्यांच्या या वक्तव्यारुन प्रचंड वादंग माजले.

साध्वींच्या वक्तव्यावर भाजपने पत्रककाढून आपली प्रतिक्रीया दिली आहे. ‘साध्वी प्रज्ञा यांनी जे विधान केले आहे. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांनी अनेक वर्षे जो शारीरिक आणि मानसिक छळ झालेला, त्यातून त्यांनी हे विधान केले असावे’, असा अंदाज व्यक्त करत भाजपने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दिवंगत हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते. भाजपने त्यांना शहीद मानले आहे आणि हीच भाजपची करकरेंविषयीची भावना आहे, असे भाजपच्या मुख्यालयातून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. कार्यालय सचिव महेंद्र पांडेय यांनी हे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

आयपीएस असोसिएशनने साध्वीच्या विधानाचा निषेध केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या विधानाचा यथेच्छ समाचार घेतला. त्याचवेळी निवडणूक आयोगाकडेही साध्वीविरोधात तक्रार करण्यात आली. या सर्व घडामोडींनंतर भाजपने घाईघाईने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत साध्वीच्या विधानापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला.