कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण : माजी आमदारासह 76 जणांवर गुन्हा, 512 कोटींच्या अपहाराचा आरोप

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शेकाप नेते, माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याचसोबत संचालक मंडळावर असणाऱ्या 14 सदस्यांवर देखील गुन्ह्याची नोंद झाली आहे. तब्बल 63 जणांच्या खात्यावर बनावट कागदपत्र सादर करून 512.54 कोटींच्यावर कर्ज काढण्यात आली असल्याचा आरोप केला जातोय. या 63 जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये अनेक जण शेकापचे पदाधिकारी आहेत.

गैरव्यवहार करून बँक ठेवीदार आणि सरकारची फसवणूक आणि तब्बल 512.54 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांवर ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील विशेष लेखापरीक्षकांनी लेखी परीक्षण केल्यानंतर त्यांच्याविरोधात एफआरआय दाखल केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चार महिन्यांपूर्वी छाननी केल्यानंतर सादर केलेल्या लेखा परीक्षण अहवालात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. कर्ज वितरण कागदपत्रे नष्ट केल्याचं, बोगस कागदपत्रांच्या आधारे 2008 पासून कर्ज वितरित केल्याचं आणि दस्तावेजांमध्ये फेरफार केल्याचं या अहवालातून उघड झाले आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पैकी 62 जण हे बँकेचे कर्जदार आहेत. त्यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज देण्यात आले आहे. त्यानंतर कर्जाची रक्कम विवेक पाटील हे चालवत असलेल्या संस्थेकडे वळण्यात आल्याचाही आरोप आहे. या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये हजारो ठेवीदार सहभागी झाले होते.