कर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची राहणार की जाणार !

बंगळूर : वृत्तसंस्था – कर्नाटकात येडियुरपा सरकारचा फैसला उद्या होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या 15 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.9) लागणार आहे. या निकालावर येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार हे अवलंबून आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळून देखील भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस चमत्कार घडवणार का याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकात 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीचे मतदान झाले. यामध्ये 61.91 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पोटनिवडणुकीचा निकालाच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. दुपारपर्य़ंत हे चित्र स्पष्ट होईल असे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. मतमोजणी 11 केंद्रावर होणार असून त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काँग्रेस आणि जेडीएस सरकारमधील 17 आमदारांनी बंडखोरी केल्याने जुलै महिन्यात एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. त्यानंतर कर्नाटकात बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले. भाजपचे 105 आमदार असून सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांना आणखी 6 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसने 15 पैकी 12 जागा आणि 3 जागा जेडीएसने लढवल्या आहेत. 224 सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत संख्याबळ 208 पर्य़ंत कमी झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी 105 आमदारांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.

दरम्यान, सत्तास्थपानेच्या दृष्टीने ही पोटनिवडणूक महत्वाची आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपकडून लढलेल्या बंडखोरांना जनता घरचा रस्ता दाखवेल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. भाजप सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक वाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 9 ते 12 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

कर्नाटक विधानसभेतील संख्याबळ : 224
भाजप – 105
काँग्रेस- 66
जेडीएस – 34