बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक, पण…

बेळगाव : सलग ४ वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगाव लोकसभेची पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकमेव मराठी स्टार प्रचारक आहे. त्याचवेळी मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीने फडणवीस यांनी मराठीच्या मुद्दावरुन प्रचाराला येऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे प्रचाराला येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी येत्या १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी बिहार व आता पश्चिम बंगालमध्ये फडणवीस यांनी प्रचार केला आहे. भाजपच्या स्टार प्रचारकाच्या यादीत फडणवीस हे एकमेव मराठी नाव आहे. येथील मराठी भाषक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नाला फडणवीस यांचा पाठिंबा असल्याने त्यांनी प्रचाराला येऊ नये, अशी भूमिका काही मराठी भाषक व महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली आहे.

भाजपने सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसतर्फ सतीश जारकीहोळी तर, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके हे रिंगात उतरले आहेत. मतविभागणी टाळण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात ८ विधानसभा मतदान संघ येत असून त्यातील बैलहोंगल आणि बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. उर्वरित ६ मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहे. बेळगाव मतदारसंघातील या तिरंगी लढतीत देवेंद्र फडणवीस प्रचाराला येणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.