ड्रग्ज प्रकरणात विवेक ओबेरॉयच्या अडचणीत वाढ ! CCB करणार पत्नीची चौकशी

बेंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकातील चंदन ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याची पत्नी प्रियांकाची चौकशी होणार आहे. प्रियंकाचा भाऊ आदित्य अल्वा हा चंदन ड्रग्ज प्रकरणात आरोपी असून तो सध्या फरार आहे. तो प्रियांकाच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी बंगळुरू क्रईम ब्रॅन्चने प्रियांकाला नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी गुरुवारी विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. त्यामुळे ओबेरॉय कुटुंबाची चिंता चांगलीच वाढली आहे.

आदित्य अल्वा हा सँडलवूड ड्रग केस मधील महत्त्वाचा आरोपी आहे. बेंगळुरू पोलीस गेले महिनाभर आदित्यचा शोध घेत आहेत. सँडलवूड ड्रग प्रकरणातील 12 आरोपींपैकी आदित्य एक आहे. त्याच्या शोधासाठी विवेकच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. पण त्याचा तिथेही शोध लागलेला नाही. आदित्य हा विवेकचा मेव्हणा असून कर्नाटकचे दिवंगत मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे.

आदित्यची बहिण आणि विवेकची पत्नी प्रियांकाला सीसीबीने शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण ती चौकशी करता उपस्थित राहिली नाही. त्यामुळे प्रियांकाला 20 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू पोलिसांनी चौकशीकरीता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात काही बड्या सेलिब्रिटींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अभिनेत्री रागिणी द्विवेदी, संजना गलरानी या अभिनेत्रींना देखील अटक करण्यात आली आहे. बेंगळुरू सीसीबीकडून याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप NCBने या प्रकरणाची चौकशी सुरु केलेली नाही.

You might also like