कर्नाटकामध्ये ‘कमळ’ फुललं, येडियुरप्पा यांनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची ‘शपथ’ !

बंगळुरू : वृत्तसंस्था – कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा कमळ फुललं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनावर झालेल्या छोटेखानी सोहळ्यात आज येडियुरप्पा यांनी शपथ घेतली आहे. ते राज्याचे २५वे मुख्यमंत्री ठरले. शपथविधीनंतर येडियुरप्पा यांच्यापुढे बहुमताची अग्निपरीक्षा असणार आहे. राज्यपालांनी ३१ जुलैपर्यंत त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

कर्नाटक विधानसभेतील १५ बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर कुमारस्वामी सरकार पडणे हे जवळपास निश्चित झाले होते. परंतु बहुमत चाचणीस विलंब झाल्यामुळे कुमारस्वामी सरकार पडण्यास उशीर झाला. अखेर कुमारस्वामी सरकार पडले आणि भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्रिपदासाठी येडियुरप्पा हाच भाजपचा चेहरा असेल असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले. मात्र, कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर लगेचच सत्तास्थापनेचा दावा न करता येडियुरप्पा यांनी केंद्रीय नेतृत्वाशी खल केला. त्यानंतर आज राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला. शपथविधी सोहळ्याला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी कडू मल्लेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पा यांना ११२ आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. अशा परिस्थितीत बंडखोर आमदारांनी भाजप सरकारला पाठींबा देणे आवश्यक आहे किंवा सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेऊ नये. सभागृहात बंडखोर आमदार गैरहजर राहिल्यास आमदारांची संख्या कमी राहून येडियुरप्पा सहज बहुमत सिद्ध करू शकतात.

 

आरोग्यविषयक वृत्त