दुर्देवी ! ऑक्सीजन पोहचण्यास झाला उशीर; कर्नाटकच्या हॉस्पिटलमध्ये 24 कोविड रुग्णांचा मृत्यू

बेंगळुरु : वृत्तसंस्था – देशात ऑक्सीजनच्या कमतरतेने मृत्यू होण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. आता कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे किमान 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना काल मध्यरात्री घडली. दुर्घटनेनंतर म्हैसूरहून चामराजनगरसाठी अडीचशे ऑक्सीजन सिलेंडर पाठवण्यात आले.

चामराजनगर हॉस्पिटलला बेल्लारीहून ऑक्सीजन मिळणार होता, परंतु ऑक्सीजन येण्यास उशीर झाल्यानंतर एवढी मोठी दुर्घटना घडली. जीव गमावलेले बहुतांश रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सीजन सप्लाय संपल्यानंतर ते तडफडू लागले आणि मरण पावले. त्यांच्या कुटुंबियांची रडून-रडून आवस्था गंभीर झाली आहे.

यापूर्वी कालाबुर्गीच्या केबीएन हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनच्या टंचाईमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. याच दिवशी यदगीर सरकारी हॉस्पिटलमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटरवरील एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. मागील आठवड्यात कर्नाटकातील अनेक हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांचा मृत्यू ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे झाला आहे.

देशभरात कोरोना संक्रमितांना बेड आणि ऑक्सीजनच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन संपल्याने 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता.