मराठा विकास प्राधिकरणाविरोधात आज कर्नाटक बंद

बंगळुरू : वृत्तसंस्था – गत महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना केल्याची घोषणा केली होती. यावरून राज्यात वादंग निर्माण झाले आहे. कन्नड संघटनांनी विरोध करत त्यांनी आज ५ डिसेंबरला राज्यव्यापी बंद पुकारला आहे.

बेळगावच्या अनगोळ भागात मराठा विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे अभिनंदनपर फलक लावले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि बेळगाव दक्षिणच्या आमदारांसह मराठी समाजाच्या काही कार्यकर्त्यांची छायाचित्रे छापण्यात आली होती. या फलकाला मराठी द्वेष्ट्या कन्नडिगांनी काळे फासल्यानंतर अनगोळ परिसरात संतापाची लाट उसळून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात
गळ्यात लाल -पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेल्या दोन तरुणांनी फलकाला काळे फासण्याचे कृत्य दिसत आहे. विर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली असून, कोणीच आक्षेप घेतला नसल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे फलकाला काळे फासून ते तरुण आरामात बिनबोभाट निघून गेले. सदर घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तो फलक तातडीने तिथून हटविण्यात आला आहे.

त्यानंतर ५ डिसेंबरला कर्नाटक बंदची घोषणा कन्नड संघटनांनी केली होती. बेंडवेळी या संघटनांकडून नेहमीच समाजविघातक कृत्ये केली जातात. त्यामुळे बंगळुरू पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कन्नड संघटनांच्या १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. बंगळुरूच्या शिवाजीनगरमध्येही सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत.