दिल्लीतील विरोधकांच्या बैठकीला ‘या’ २ बड्या नेत्यांची दांडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी भाजपलाच बहुमत मिळणार असे दाखवले जात असले तरी विरोधकांनी ऐनवेळी काय करायचे यासाठी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी यासाठी सर्व नेत्यांना पत्र लिहून यासाठी निमंत्रण देखील दिले आहे.

आज दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी दीड वाजता विरोधकांची बैठक पार पडणार आहे. मात्र या बैठकीतून कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी माघार घेतली आहे. त्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर या सगळ्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी आघाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यांच्या ऐवजी प्रफुल्ल पटेल या बैठकीसाठी जाणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, सपाचे नेते अखिलेश यादव यांनी यापूर्वीच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या बैठकीला महत्वाच्या पक्षांचे नेतेच नसल्याने या बैठकीला कितपत अर्थ उरतो हा प्रश्नच आहे. त्यामुळे एक्झिट पोलचा अंदाज पाहून विरोधकांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कि काय याची चर्चा होत आहे.

दरम्यान, रविवारी झालेल्या शेवटच्या टप्प्यानंतर माध्यमांनी केलेल्या सर्व्हेमध्ये सत्ताधारी भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट होत असल्याने भाजपसमर्थकांनी आतापासूनच विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात आलेली आहे. त्यामुळे २३ तारखेपर्यंत वाट पाहणे महत्वाचे ठरणार आहे.