‘लेक्चर’मध्ये विद्यार्थीनी मोबाईलवर ‘बिझी’, प्राचार्यांनी वर्गात येऊन घातला 16 फोनवर ‘हातोडा’ (व्हिडीओ)

कर्नाटक : वृत्तसंस्था – तरुण मुलांमध्ये आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असणारे मोबाईलचे व्यसन सध्या चर्चेचा विषय झाला आहे. तासंतास खिळवून ठेवणाऱ्या मोबाईल गेम्समुळे यात वाढच होत चालली आहे. हे तरुण नेहमीच त्यांच्या मोबाईलवर व्यस्त दिसतात, परंतु कर्नाटकमधील एका महाविद्यालयाचे प्राचार्य इतके मुलांच्या या वागण्याने इतके संतापले की त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांचे मोबाईल ताब्यात घेतले आणि हातोडीने फोडून टाकले. या प्रिन्सिपल सरांचा हा मोबाईल तोडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विद्यार्थ्यांच्या मुजोरीमुळे निर्णय :
वास्तविक पाहता, कर्नाटकातील एमईएस चेतन्य पीयू महाविद्यालयाचे प्रिन्सिपल क्लासरूमध्ये व्याख्यान देत असताना यावेळी विद्यार्थी सातत्याने मोबाईलचा वापर करत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अनेकदा इशारा दिला होता की जर कोणताही विद्यार्थी अभ्यासाच्या वेळी किंवा वर्गात लेक्चर देताना मोबाईल वापरताना पकडला गेला तर तिथेच त्याचा मोबाइल तोडला जाईल.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामान्य नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे याकडे दुर्लक्ष केले आणि प्रिंसिपल वर्गात व्याख्याने देताना ते त्यांच्या मोबाईलमध्येच व्यस्त होते. हे पाहून मुख्याध्यापक इतके संतापले की त्यांनी तातडीने हातोडीची मागणी केली आणि विद्यार्थ्यांचे मोबाइल हातोडीने तोडले.प्राचार्यांनी असा मोबाइल तोडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले की विद्यार्थ्यांनी आपला मोबाइल फोन समोर लेक्चर सुरु असताना देखील एकमेकांशी चॅटिंग करण्यासाठी वापरला होता, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

गुरुवारी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी अचानक तपासणी करून १६ मोबाइल फोन जप्त केले. यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या सभागृहात जमा होण्यास सांगितले. विद्यार्थी जमल्यानंतर प्राचार्य तेथे पोहोचले आणि विद्यार्थ्यांसमोर जप्त केलेले मोबाइल हातोड्याने फोडून टाकले.

कर्नाटकमधील काही शैक्षणिक संस्थांनी महाविद्यालयाच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटकमधील एक शैक्षणिक अधिकारी म्हणाले,’शाळा तसेच महाविद्यालयांमध्येही मोबाईलच्या गैरवापरामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे आणि अशा कठोर शिक्षा आवश्यक आहेत.’