Pre-Wedding शूटसाठी गेलेल्या जोडप्याचा नदीत पडून मृत्यू

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या विवाह सोहळा एका विधीपुरता मर्यादित न राहता, लग्नाच्या आधीच्या क्षणांचा आनंद साठवून ठेवण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. भावी वधू-वराच्या पहिल्या भेटीपासून ते एकमेकांच्या विवाह सोहळ्यापर्यंतचे सर्व क्षण पुन्हा अनुभवून साठवण्यासाठी प्री-वेडिंग (Pre-Wedding) शूट केले जात आहे. पण असे प्री-वेडिंग शूट करणे मैसूरमधील एका जोडप्यासाठी जीवघेणे (couple-drowns-during-pre-wedding-photoshoot-both-died) ठरले आहे. कर्नाटकातील तालकड येथील कावेरी नदीवर शूटिंग दरम्यान जोडप्याचा तोल जाऊन नदीत पडून मृत्यू झाला. सोमवारी (दि. 9) दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शशिकला आणि चंद्रू असे या मृत जोडप्याचे नाव आहे. त्यांचा एक आठवड्यापूर्वी साखरपूडा झाला होता. शशिकला आणि चंद्रू एक फोटोग्राफर आणि दोन नातेवाईकांसह मुदुकुदर येथील मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात गेले होते. तेथे दोन बोटींनी नदी पार करून दुसऱ्या बाजूला जात होते. त्यावेळी त्या जोडप्याच्या नातेवाईकांनी फोटो शूट करण्यास सुरुवात केली. ही बोट साधारणपणे 10 ते 15 मीटर अंतरावर गेली होती. तेवढ्यात पोझ देण्यासाठी जोडपे उभे राहिले, त्यांचा तोल घेल्याने शशिकला पाण्यात पडली. त्यावेळी शशिकलाला वाचविण्याच्या प्रयत्नात बोट उलटली. चंद्रू, मच्छीमार आणि एक नातेवाईक असे नदीत पडले. मच्छीमार नदीतून सुरक्षित ठिकाणी पोहला, मात्र शशिकला आणि चंद्रू यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.