कर्नाटक : अद्यापही फ्लोअर टेस्ट नाही, विधानसभेत रात्रभर भाजपा आमदार धरणे देणार

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील असणारे काँग्रेस जेडीएसचे सरकार पडणे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या समर्थनार्थ असणाऱ्या आमदारांची संख्या ९८ वर पोहचली आहे. १५ बंडखोर आमदार मुंबईत आहेत. सध्या तरी बहुमत सिद्ध करण्यासाठी १०२ आमदारांची गरज आहे. कुमारस्वामी यांच्याजवळ ९८ आमदार आहेत. तर भाजपच्या बाजूने १०५ आमदार आहेत. परंतु विश्वास दर्शक ठराव मांडण्याच्या आधीच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावरील चर्चेदरम्यान गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.

भाजप आमदारांचे धरणे आंदोलन

या निर्णयावर नाराज झालेल्या भाजप आमदारांनी विधानसभेत रात्रभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून आजच बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे. विधानसभा अध्यक्षांनी राज्यपालाच्या पत्राला उत्तर देण्याची मागणी भाजप आमदारांनी केली आहे. सभागृहात लवकरात लवकर विश्वासदर्शक ठराव घेण्यात यावा अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे.

कर्नाटकमधील भाजपचे प्रमुख बीएस येदियुरप्पा यांनी विधानसभेत सांगितले की, रात्रीचे १२ जरी वाजले तरी विश्वासदर्शक ठरावावर मतदान आजच झाले पाहिजे. काँग्रेस आमदार HK पाटील यांनी म्हंटले की, संविधानानुसार राज्यपालांनी विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करणे योग्य नाही. मी राज्यपालांना असे न करण्याची विनंती करतो.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. पण यावर चर्चा सुरु होताच सभागृहात गोंधळाला सुरवात झाली. या गोंधळामुळेच अध्यक्षांनी सभागृह तहकूब केले आणि विश्वास दर्शक ठरावर मतदान झालेच नाही.