‘दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले’

बंगळुरु : वृत्तसंस्था – ‘दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यात आले’ असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केले आहे. काँग्रेसच्या नेत्याने असे वादग्रस्त विधान करणे हे काही नवे नाही. कारण कर्नाटकातील जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार आपल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरुन नेहमीच चर्चेत राहिले आहे. रविवारी ते एका कार्यक्रमात बोलत होते.

दावणगेरे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना जी परमेश्वर यांनी काँग्रेसमधील नेत्यांवर आरोप केले. यावेळी बोलताना जी परमेश्वर म्हणाले की, “बसवलिंगप्पा मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. के. एच. रंगनाथ यांच्यासोबत सुद्धा असेच झाले. आमचे मोठे बंधू मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले नाहीत. मी स्वत: तीन वेळा मुख्यमंत्री पदापासून वंचित राहिलो. मात्र, काही संघर्षानंतर माझ्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. दलित नेत्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली नाही. सरकारमध्ये सुद्धा दलितांसोबत भेदभाव होत आहे.”

यावेळी बोलताना जी परमेश्वर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर आरोप केल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना जी परमेश्वर म्हणाले की, “आरक्षणाची व्यवस्था आहे. मात्र, बढतीबाबत आजही भेदभाव केला जातो. सात अधिकाऱ्यांबद्दल माहिती मिळाली आहे की, त्यांना वरच्या पदावरून खालच्या पदावर आणले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.” असा गंभीर आरोप त्यांनी केला. जी परमेश्वर यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत.