निवडणूक आयोगाचा ब्रँड अॅम्बेसिडर राहुल द्रविडला मतदान करता येणार नाही

बंगळुरु : वृत्तसंस्था – बंगळुरुमध्ये १८ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड मतदान करू शकणार नाही. मतदार यादीत द्रविडचे नाव नसल्याने त्याला यावेळी मतदान करता येणार नाही. कर्नाटक निवडणूक आयोगाचा द्रविड हा ब्रँड अॅम्बेसिडर असून मतदानापासून आत तो वंचित राहणार आहे. ब्रँड अॅम्बेसिडरच मतदान करू शकणार नसल्याने याची देशभरात चर्चा सुरू आहे.

२०१८ कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल द्रविड आपले घर बदलले होते. राहुलने त्यावेळी जुन्या मतदारसंघातून आपले नाव वगळले होते. पण तो नव्या घरी जेव्हा राहायला गेला तेव्हा त्याने आपल्या नव्या पत्त्यावरून मतदानाचा अर्ज न भरल्यामुळे राहुलचे नाव मतदार संघातून वगळण्यात आले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्याला मतदान करता येणार नाही.
मतदारसंघातून आपले नाव वगळ्यासाठी मतदाराला अर्ज क्रमांक ७ भरला होता. त्यानंतर मतदार यादीतून त्याचे नाव हटवण्यात आले. नव्या पत्त्यावरील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी राहुलला अर्ज क्रमांक ६ भरणे आवश्यक होते. परंतु राहुलने अद्याप अर्ज क्रमांक ६ भरलेला नाही. त्यामुळे मतदार यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही.

निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही दोनवेळा द्रविडच्या घरी गेलो होतो. परंतु आमची द्रविडसोबत भेट झाली नाही. द्रविडकडे १६ मार्चपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी होती. परंतु आता ती संधी त्याने गमावलेली आहे. राहुल द्रविड ज्या भागात राहतो तिथल्या मतदार संघात १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.