’13 एप्रिलनंतर कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळेल’, BJP आमादाराच्या वक्तव्याने खळबळ, येडीयुराप्पांचे टेन्शन वाढले

बंगळूर : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीपासूनच कर्नाटकचे राजकारण अस्थिर झाले आहे. कर्नाटकात काँग्रेस-निजदचे सरकार पाडून भाजपने सत्ता हिसकावली असली तरी भाजपात सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे चित्र आहे. मंत्रिमंडळविस्तारावरून मुख्यमंत्री येडीयुराप्पांना आमदारांची प्रचंड नाराजी झेलावी लागत आहे. आता एका आमदाराने थेट मुख्यमंत्री बदलाची तारीख जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या आमदाराने 13 एप्रिलनंतर कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळेल असे वक्तव्य केले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि निजदने एकत्र येऊन सरकार स्थापन करुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. मात्र दीड वर्षानंतर आमदारांना आपल्या गोटात घेऊन भाजपने काँग्रेस-निजदकडून सत्ता हिसकावून घेतली. आता पुन्हा एकदा कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप आमदारांनी बंड पुकारले आहे. यामुळे येडीयुराप्पा यांची खुर्ची धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागिल महिन्यात कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी भाजपच्या आमदारांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर येडीयुरप्पांनी त्या आमदारांना हायकमांडकडे जाण्यास सांगितले. मंत्रिमंडळात ज्यांना संधी मिळाली त्यांची नावे दिल्लीत ठरवण्यात आल्याचे सांगून एक मंत्रीपद रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, यानंतर भाजपच्या आमदारांनी येडीयुराप्पांवर रहस्यमयी सीडीवरुन गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने राजकीय वातावरण तापले असून येडीयुराप्पांची डोकेदुखी वाढली आहे.

भाजप आमदारांचे आरोप

मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपचे आमदार बीपी यतनाल यांनी गंभीर आरोप केले. कर्नाटकातील आमदार मागील तीन महिन्यापासून सीडीवरुन मुख्यमंत्री येडीयुरप्पांना ब्लॅकमेल करत आहेत. यापैकी एकाला राजनैतिक सचिव आणि दोघांना मंत्री बनविण्यात आले आहे, असे बीपी यतनाल यांनी सांगितले. यामुळे ती सीडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

भाजप आमदार बसनगौडा पाटील यतनाल म्हणाले, कर्नाटकमध्ये उगडी सणापासून नवीन वर्ष साजरे केले जाते. हे वर्ष यंदा 13 एप्रिलपासून सुरु होत आहे. या दिवसाला कर्नाटकला नवीन मुख्यमंत्री मिळेल असे वक्तव्य पाटील यांनी केले. ते विजयपुरमध्ये बोलत होते. मला हात पसरुन मंत्रीपद मागायची गरज नाही. कारण आपला माणूस मुख्यमंत्री होणार आहे. तोच मला मंत्रीपद देणार आहे. हा नेता उत्तर कर्नाटकातील असेल, वाट पहा आणि बघा असे ते म्हणाले.