अखेर कर्नाटक सरकार कोसळले, कर्नाटकात भाजप सत्तेत येणार ?

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटक विधानसभेत गेल्या काही दिवसांपासून रणसंग्राम सुरु आहे. अखेर आज विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. या मतदानात अपेक्षेप्रमाणे कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला आहे. मी विश्वास मत प्रस्तावासाठी तयार आहे आणि आनंदाने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे बोलून कुमारस्वामी यांनी आधीच सरकार कोसळण्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनामा दिला आहे.

बहुमतासाठी लागणारा १०५ चा आकडा काँग्रेस-जेडीएस सरकारला गाठता आला नाही. ९९ विरुद्ध १०५ मतांनी कर्नाटक सरकारचा पराभव झाला आहे. ६ मतांनी सरकार पडले आहे. काँग्रेस जेडीएस सरकार कोसळल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे बहुमत भाजपकडे देखील नाही. भाजपच्या आमदारांनी सरकार पडताच एकच जल्लोष केला आहे. सरकार टिकविण्यासाठी काँग्रेस आमदार डी. के. शिवकुमार यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत.

काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी काही दिवसांपूर्वींच राजीनामा दिला होता. त्यानंतर कर्नाटकी नाट्य सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं. यानंतर अखेर आज कर्नाटकच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यात कुमारस्वामींना मोठा धक्का बसला. आता यापुढे कर्नाटकात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त