कुमार स्वामी सरकारच्या चिंतेत वाढ ; सात आमदार राहिले गैरहजर

बंगळुरू : कर्नाटक वृत्तसंस्था – काँग्रेसच्या आमदारांची नाराजी वाढत गेल्याने कुमार स्वामी यांना गेल्या दोन महिन्यापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस मधील काही नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या माध्यमातून झळकत असतांनाच आता काँग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्यात आले होते.  त्या अधिवेशनाला काँग्रेसचे ७ आमदार गैरहजर राहिल्याने भाजप कडून या घटनेचा खरपूस समाचार घेतला जात आहे. कुमार स्वामींचे सरकार अल्पमतात असल्याने त्यांच्या सरकार समोर मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात असा दावा भाजपने केला आहे.

काँग्रेस मधील उदासीन आमदार कुमार स्वामी यांचे सरकार पडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. आज पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच सरकार अल्पमतात आणायचा विचार भाजप करत असून त्यांच्या या मनसुब्याला काँग्रेसच्या काही आमदारांचा गुप्त पाठींबा आहे.

काँग्रेसने आपल्या बंडखोर आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून पक्षाच्या अंकुशावर हे आमदार सध्या तरी रोखले जात नसल्याचे सध्या चित्र आहे. तर कुमार स्वामी यांच्या सरकारला लागलेली घरघर त्यांना सत्तेतून पाय उतार केल्या शिवाय राहणार नाही असे ज्योतिषांनी सुद्धा भविष्य वर्तवले आहे. एकंदरच कर्नाटकातील सत्ताकारण रोज नवे वळण घेत असल्याचे समजते आहे.