पत्नीच्या मृत्यूनंतर पूर्ण केलं तिचं स्वप्न, अनोख्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘हा’ Video

बंगळुरू : वृत्तसंस्था – प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. सगळ्या गोष्टी बोलूनच व्यक्त करायच्या असतात असं नाही. काही गोष्टी न बोलता कृतीतून व्यक्त केल्या जातात, यालाच प्रेमाची भाषा म्हटले जाते. अशाच एका खऱ्या प्रेमाची गोष्ट समोर आली आहे. कर्नाटकातील उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांनी नुकतेच आपल्या नव्या बंगल्यात गृहप्रवेश केला. मात्र, या गृहप्रवेशाची देशभरात चर्चा केली जात आहे. याचे कारण म्हणजे श्रीनिवास यांनी आपल्या नव्या घरामध्ये पत्नीच्या मेणाच्या पुतळ्यासह प्रवेश केला.

कर्नाटकचे उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांची पत्नी माधवी यांचे जुलै 2017 मध्ये एका कार अपघातात निधन झाले. पत्नीची आठवण सोबत असावी आणि तिचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी आर्किटेक्टच्या मदतीने पत्नीचा मेणाचा पुतळा तयार करून घेतला. हा मेणाचा पुतळा हुबेहुब त्यांच्या पत्नीसारखा दिसत आहे. या पुतळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

श्रीनिवास गुप्ता आणि त्यांची पत्नी माधवी हे तीन वर्षापूर्वी आपल्या मुलींसोबत तिरुपतीला जात होते. तिरुपतीला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघतात माधवी यांचा जागीच मृत्यू झाला. माधवी यांचे स्वप्न होते की, आपला एक बंगला असावा. अखेर श्रीनिवास यांनी तीन वर्षांनी आपल्या पत्नीचे स्वप्न पूर्ण केले. एवढेच नाही तर कुटुंब पूर्ण करण्यासाठी त्यांनी पत्नीचा मेणाचा पुतळा देखील तयार करुन घेतला.

या संदर्भात श्रीनिवास गुप्ता यांनी सांगितले की, माझ्या पत्नीला पुन्हा माझ्या घरात पाहून मला खूप आनंद झाला आहे. बेंगळुरू मधील कलाकार श्रीधर मूर्ती यांना माझ्या पत्नीचा पुतळा बनवण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. हा पुतळा तयार करण्यासाठी सिलिकॉनचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून लोकांनी श्रीनिवास यांचे कौतुक केले आहे.