स्निफर डॉगने 12 KM धावत हत्येमधील आरोपीला पकडले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कर्नाटकमध्ये स्निफर डॉगने तब्बल 12 किमी धावत पोलिसांना हत्येच्या आरोपीला अटक करण्यात मदत केल्याची घटना समोर आली आहे. जवळपास एका आठवड्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. पण स्निफर डॉगने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दावणगेरे जिल्ह्यात 10 जुलै रोजी हा गुन्हा घडला होता. दोन व्यक्तींमध्ये पैशांवरुन भांडण झाले होते. त्यावेळी एका व्यक्तीने आधीच्या एका गुन्ह्यात पोलीस ठाण्यातून चोरी केलेली बंदूक वापरत समोरील व्यक्तीवर गोळीबार करत हत्या केली. चेतन असे आरोपीचे नाव असून मृत व्यक्तीची ओळख चंद्रा नायक अशी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेततने मित्राकडून दीड लाख रुपये उधार घेतले होते.

तो वारंवार आपले पैसे परत देण्याची मागणी करत होता. यानंतर चेतनला चंद्रा नायकला गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळाली असून तो पोलिसांना कळवेल अशी शंका आली होती. यामुळेच त्याने चंद्रा नायकची गोळ्या घालून हत्या केली. पोलीस जवळपास एका आठवड्यापासून गुन्ह्याची उकल करत होते. पण कोणताही पुरावा त्यांच्या हाती लागत नव्हता. यावेळी पोलिसांनी टुंगा या स्निफर डॉगची मदत घेत त्याला पकडले आहे.

आरोपी चेतन दोन सहकार्‍यांसोबत लपला असलेल्या घराबाहेर जाऊन टुंगा थांबला. पोलिसांनी चौकशी केला असता एक व्यक्ती संशयितपणे वागत असल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन चौकशी केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.