कंगना रणौतच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, कर्नाटक पोलिसांकडून … दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध कर्नाटक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणे कंगनाला भोवले असून, कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयाने तिच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाची अंलबजावणी पोलिसांनी केली आहे.

कृषी विषयक विधेयकावरुन देशभरात वातावरण पेटले होते. शेतकरी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. तेव्हा कंगनाने या आंदोलनाला ट्विटच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवला होता. त्या अनुषंगाने वकील एम. रमेश नाईक यांनी प्रथम वर्ग न्यायदंधिकारी न्यायालयात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने क्याथासंगरा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना कंगनाच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या ट्विटमुळे भावना दुखावल्याचे नाईक यांनी सांगितले.

तथापि, याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार कंगनाविरुद्ध दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक अपमान करणे, चिथावणी देणे आदी कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काय म्हणाली होती कंगना ?

“कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं सोंग करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले.” अशा शब्दांत कंगनाने आंदोलकर्त्यांवर टीका केली होती.