कर्नाटक रात्रीतून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसवल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यासाठी येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले असून, त्यांनी रायन्ना यांच्या पुतळ्याला विरोध दर्शवला आहे. हा पुतळा इतरत्र हलवण्याची मागणी मराठी भाषिकांनी केली आहे.

संगोळी रायन्ना हे कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख होते. काही कन्नड संघटनांनी रात्री ३ वाजता यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पिरणवाडी गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात केला आहे. या आधीही कर्नाटकातील बेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांनी रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने वाद उद्भवला होता. त्यानंतर पोलिसांनी येथील आंदोलन दडपण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा केलेला.

येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी वाल्मिकी या महापुरुषांचे समान उंचीचे पुतळे उभारण्याचा ठराव मनगुत्ती ग्रामपंचायतीने केला होता. त्यानुसारच गावातील काही तरुणांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला होता. पण एका गटाने त्यास विरोध करत पुतळा काढण्यासाठी दबाव सुरु केला. राज्य सरकारच्या आदेशानंतर हा पुतळा हटवण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणानंतर देशभरातील शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. तसेच महाराष्ट्र सरकारनेही मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पत्र लिहले. तर सीमाभागाचे समनव्ययक मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पत्र पाठवून घडलेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केलेला.