कोरोनासंदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर, म्हणाले – ‘PM मोदी काय म्हणतात बघू अन् ठरवू’

पोलीसनामा ऑनलाइनः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कर्नाटकात कठोर निर्बंध लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. कर्नाटकामध्ये बुधवारी (दि.5) तब्बल 50 हजार रुग्ण आढळले असून त्यात अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या बंगळुरु शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात आणखी कठोर निर्बंध लावण्यात येणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना येडियुरप्पा म्हणाले की, राज्य सरकार कोरोनासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशांची वाट पाहत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांच्या आधारे आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री के. सी. रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर येडियुरप्पांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करतील, अंदाज येडियुरप्पांनी व्यक्त केला आहे. केंद्राने राज्यांना निर्देश देणे अशा परिस्थितीमध्ये सामान्य बाब आहे. आम्ही त्या निर्देशांचे पालन करू असे ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक मंत्री नियुक्त केला असून तुम्ही थेट त्यांच्या कामावर लक्ष ठेवून आहात का असा प्रश्नही त्यांना विचारला असता, ते म्हणाले की, मंत्र्यांना त्यासंदर्भातील निर्देश दिले असून रोज त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात येत आहे. प्रत्येक मंत्री त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पोहचले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान गेल्या आठडयापासून कर्नाटकात जनता कर्फ्युचं आवाहन केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, कोरोना नियमांचे पालन करा असे आवाहन यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.